शिक्षक,पदवीधर निवडणुकीत पराभव झाल्यानेच जुनी पेन्शन योजना लागू करीत नाहीत – किरण साठे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन
प्रतिनिधी : अकलूज : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी अकलूज यांच्या मार्फत निवेदन पाठवुन जुनी पेन्शन योजना चालू करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचारी सद्या संपावर असुन अधिकारी आणि कर्मचारी संपावर गेल्याने जनतेचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत,त्यामुळे संपावर गेलेल्या अधिकारी कर्मचारी यांची जुनी पेन्शन योजना तात्काळ चालू करण्यात यावी आणि जनतेचे चालले हाल त्वरित थांबवावेत.अशी मागणी करण्यात आली आहे.नुकत्याच झालेल्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या चार उमेदवारांना सुशिक्षित,कर्मचारी,अधिकारी यांनी अस्मान दाखवल्याचे शल्य एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये असल्याने जुनी पेन्शन योजना लागू करीत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस आणि बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी केला आहे.यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण साठे,शहराध्यक्ष सुरेश गंभीरे,युवक तालुका उपाध्यक्ष जाकीर शेख,बहुजन ब्रिगेडचे माळशिरस तालुका अध्यक्ष धनाजी पाटील,हनुमंत पाटोळे,इरफान बागवान,मोहसीन शेख,सरफराज बागवान,जुबेर बागवान इत्यादी उपस्थित होते.
