
अकलूज भाजी मंडईच्या निर्णयाचे पुनर्विलोकन करा – वंचित बहुजन आघाडीने दिले निवेदन
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अकलूजमधील महात्मा फुले भाजी मंडई बंद करीत उदयरत्न टाऊनशिप या उपनगराकडे स्थलांतरित करण्याचा निर्णय नुकताच अकलूज ग्रामपंचायतीच्या वतीने घेतला आहे. यासाठी कोरोनाचा संसर्ग वाढू नये असे कारण पुढे करण्यात आले आहे.
वास्तविक पाहता सध्या वेगवेगळ्या ठिकाणी किरकोळ विक्रेते विक्रीसाठी बसत असुन त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होण्याची शक्यता राहील आणि हेच नियोजन एकत्रितरित्या एकाच ठिकाणी केले तर त्यामुळे कोरोनाबाधित व्यक्ती त्याठिकाणी संपर्कात आल्यास कोरोनाचा संसर्ग अनेकांना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
तसेच सद्यस्थितीतील मंडईची जागा ही अकलूज गावाच्या बाहेर असल्यामुळे अकलूजमधील नागरिकांच्या दैनंदिन मंडई खरेदीच्या व्यवहारात गैरसोय निर्माण होणार आहे. अशावेळी किरकोळ भाजी खरेदीसाठी गरिबांना आर्थिक, मानसिक त्रास होणार आहे. त्यामुळे हा उपाय म्हणजे रोगापेक्षा ईलाज भयंकर असा सूर नागरिकांमध्ये उमटू लागला आहे.
यासाठी नागरिकांसोबतच विक्रेत्यांचीही सोय व्हावी म्हणून आधीच्या नियोजनाप्रमाणे त्यांना वेगवेगळ्या सोईच्या ठिकाणी बसू देण्यात यावेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येऊ नये अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आलेली आहे. सर्वसामान्य लोकांच्या न्यायासाठी वंचित बहुजन आघाडी कटीबद्द असून प्रशासनाने भाजी विक्रेत्यांवर कारवाई केल्यास वंचित बहुजन आघाडीकडुन तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असे वंचितचे जिल्हा कार्याध्यक्ष धीरज मोरे व तालुकाध्यक्ष अभिजीत गायकवाड यांनी यावेळी सांगितले.