
श्री क्षेत्र जोतिबा मंदिरातील हक्कदार पुजाऱ्यांची प्रथा बंद करून पगारी पुजाऱ्यांची नेमणूक करा – राजेश खरे
प्रतिनिधी: श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथील हक्कदार पुजाऱ्यांची प्रथा बंद करून पगारी पुजाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गुरव यांनी स्वीकारले. राजेश खरे यांनी दिलेल्या निवेदनात तात्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.सदर दिलेल्या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांचे लक्ष एका गंभीर विषयाकडे वेधू इच्छित असल्याचे म्हटले आहे.त्यामध्ये कोल्हापूरचे आराध्य दैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र जोतिबा मंदिरामध्ये सध्या कार्यान्वित असलेली पुजारी पद्धत आणि त्या अनुषंगाने उद्भवणारे प्रश्न अत्यंत चिंताजनक आहेत. असल्याचे नमूद केले आहे.या संदर्भात महाराष्ट्र विकास सेना पक्षाने खालीलप्रमाणे मागण्या केलेल्या आहेत. १.वर्तणुकीत सुधारणेची गरज: गेल्या काही काळापासून मंदिरातील काही हक्कदार पुजाऱ्यांची वागणूक सामान्य भाविकांशी उद्धटपणाची आणि अरेरावीची असल्याचे निदर्शनास येत आहे.भक्तांकडून सक्तीची दक्षिणा मागणे किंवा पूजेच्या नावाखाली अडवणूक करणे अशा तक्रारी वाढत आहेत.२.पगारी पुजारी नेमणूक: पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या धर्तीवर,जोतिबा मंदिरातूनही पुजाऱ्यांची वंशपरंपरागत पद्धत बंद करण्यात यावी.त्याऐवजी शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेल्या आणि विहित परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व्यक्तींची ‘पगारी पुजारी’ म्हणून नेमणूक करण्यात यावी.३.पारदर्शकता आणि शिस्त: पगारी पुजारी नेमल्यामुळे मंदिराच्या उत्पन्नात पारदर्शकता येईल आणि पुजाऱ्यांवर देवस्थान समितीचे पूर्ण प्रशासकीय नियंत्रण राहील.यामुळे मंदिरातील शिस्त सुधारेल आणि सर्व भाविकांना समान वागणूक मिळेल.४.भक्तांची लूट थांबवणे: सध्याच्या पद्धतीमुळे अनेकदा भक्तांची आर्थिक लूट होत असल्याचे चित्र दिसते.शासकीय वेतन श्रेणीवर पुजारी नेमल्यास हा प्रकार कायमचा बंद होईल.तरी प्रशासनाने या निवेदनाची गंभीर दखल घेऊन,जोतिबा मंदिराच्या पावित्र्यासाठी आणि भाविकांच्या सोयीसाठी सध्याची पुजारी पद्धत रद्द करून पगारी पुजारी नेमण्यासाठी तातडीने कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विरोधात बिंदू चौक येथे दिनांक 11 मे 2026 रोजी तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल याची नोंद असा गंभीर इशारा महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना दिला आहे