
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचे संकेत ! महाराष्ट्र विकास सेना पक्षाची अकलूजमधे आढावा बैठक
प्रतिनिधी : : अकलूजमधे महाराष्ट्र विकास सेना पक्षाची आढावा बैठक पक्षप्रमुख किरणसाहेब साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली.यावेळी प्रदेश सचिव अनिल साठे,प्रदेश संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे,पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख धनाजी साठे,सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पाटील,माळशिरस तालुका अध्यक्ष बापूसाहेब वाघमारे, तालुका कार्याध्यक्ष राहुल खंडागळे,उप कार्याध्यक्ष भैय्या पवार,माढा विधानसभा अध्यक्ष बिभीषण साठे,युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे,तालुका अध्यक्ष आदित्य काकडे,तालुका उपाध्यक्ष दीपक कांबळे,रोहन सोनवणे, यांच्यासह माळशिरस तालुक्यातील शहर अध्यक्ष, विभाग अध्यक्ष शाखा अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीत पक्षप्रमुख किरणसाहेब साठे यांनी शाखेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचा आदेश दिला. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढविण्याचे संकेत दिले.नगरपंचायत, नगरपालिका,जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची माहिती घेऊन इच्छुक उमेदवारांनी पक्षाच्या तालुका अध्यक्ष यांच्याकडे नोंदणी करण्याची सूचना केली.नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश दिल्याने महाराष्ट्र राज्यातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत,त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र विकास सेना पक्ष तयारीला लागला असून या बैठकीत इच्छुकांनी पक्षाशी संपर्क साधण्याच्या सूचना दिल्याने मविसेने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढविण्याचे संकेत दिले आहेत.