पंढरपूर तालुक्यातील वाळू माफियावर मोक्का अंतर्गत कारवाई करा—राजेश खरे
प्रतिनिधी—सोलापूर–कौठाळी ता.पंढरपूर येथील व संपूर्ण पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफिया यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे बहुजन युवा ब्रिगेडचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राजेश खरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याच तालुक्यातील गावामध्ये वाळूचा शासनाच्या वतीने लिलाव झालेला नसताना पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैद्य वाळू उपसा करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू प्रामुख्याने कौठाळी ता.पंढरपूर येथे पंढरपूर शहराकडील बाजूस अतिशय मोठ्या प्रमाणावर अवैद्य वाळू उपसा करण्यात येत असून पंढरपूर तालुक्यातील ज्या गावामध्ये अवैद्य वाळू उपसा केला जातोय त्या गावाचे महसूल विभागाचे तलाठी,सर्कल,तसेच पोलीस स्टेशनचे बिट हवालदार हे या संपूर्ण प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे पहावयास मिळत असल्याने या अवैध वाळू उपसा करण्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला जात असताना संबंधित अधिकारी व पोलीस कर्मचारी हे फक्त बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत.
तरी आपल्या कार्यालयमार्फत नेमण्यात आलेल्या पथकामार्फत अवैद्य वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियावर धाडी टाकून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करून संबंधित असलेल्या अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात अवैद्य वाळू उपसा चालू असेल त्या महसूल व पोलीस खात्यातील जबाबदार अधिकारी याला जबाबदार धरून त्यांच्यावरही खातेनिहाय कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक सोलापूर यांच्या कार्यालयासमोर दिनांक 9 /11/2020 रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा राजेश खरे यांनी दिला आहे.
