
१ सप्टेंबर रोजी आयुक्तालयावर धडक मोर्चा; ‘महाराष्ट्र विकास सेना’ पक्षाचे बाळासाहेब कांबळे यांचा इशारा
पुणे: प्रतिनिधी :
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, मोहोळ, सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यांत इफको टोकियो, फ्युचर जनरली आणि टाटा एआयजी या विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या बोगस पशुधन विमा घोटाळ्याची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी आज पशुसंवर्धन आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे येथील आयुक्त मा. श्री. डॉ किरण पाटील यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले. प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई न केल्यास येत्या १ सप्टेंबर २०२६ रोजी पशुसंवर्धन आयुक्तालयावर भव्य धडक मोर्चा काढण्याचा इशाराही कांबळे यांनी दिला आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, संबंधित तिन्ही विमा कंपन्यांचे नेमलेले इन्व्हिस्टिगेटर (तपास अधिकारी) आणि एजंट्स हेच या संपूर्ण घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत.त्यांच्याच संगनमताने आणि एजंट्समार्फत जिल्ह्यात बोगस पशुधन विमा क्लेम मंजूर करून घेण्याचे मोठे रॅकेट सुरू आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीतून इफको टोकियो कंपनीच्या इन्व्हिस्टिगेटर व एजंट यांच्या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश होणार असल्याचे समोर येत आहे. या सर्वांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.मोहोळ तालुक्यात बोगस डॉक्टरांच्या नावे क्लेम या घोटाळ्याचा पुरावा म्हणून, इफको टोकियो इन्शुरन्स कंपनी’च्या माध्यमातून दिनांक १ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२६ या दरम्यान मोहोळ तालुक्यातील एका प्रकरणात चक्क बोगस डॉक्टर दाखवून खोटा क्लेम दाखल करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या विशिष्ट प्रकरणाची देखील तातडीने चौकशी व्हावी, असे निवेदनात म्हटले आहे.महाराष्ट्र विकास सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनाची पशुसंवर्धन आयुक्त श्री. किरण पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे. सोलापूर जिल्ह्यातील या कथित बोगस पशुधन विमा घोटाळ्याची सखोल आणि रीतसर चौकशी केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन त्यांनी बाळासाहेब कांबळे आणि उपस्थित शिष्टमंडळाला दिले आहे. आता यावर प्रशासन काय पावले उचलते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.