राज्यातील बारा साखर कारखाने लिलावात निघणार : उपमुख्यमंत्र्यांची माहिती व भाजपला अप्रत्यक्षरीत्या टोला!
सोमेश्वर प्रतिनिधी- राज्यात भाजपने सुरू केलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या मोहिमेदरम्यान सहकारी साखर कारखान्यांचे खासगीकरण करून कमी पैशात साखर कारखाने घेतल्याची टीका सुरू केली आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल राज्यात अजूनही बारा साखर कारखाने लिलावात निघणार आहेत, ज्यांना हे कारखाने चालवायला घेण्याची ऐपत असेल, कारखाने चालवायचे असतील त्यांनी ते जरूर घ्यावेत असे आवाहन करीत भाजपला टोला हाणला आहे.
दोन दिवसापूर्वी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडवत राष्ट्रवादीचे सोमेश्वर विकास पॅनल निवडून आले. हे पॅनल निवडून येताना या पॅनलमधील बहुतेक सर्वच उमेदवार 16 ते 17 हजार मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. राज्यातील कोणत्याही साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या तुलनेत सर्वाधिक मतांनी हा विजय झाला आहे.या निवडणुकीनंतर दुसऱ्या दिवशी गळीत हंगामाचा शुभारंभ असल्याने अजित पवार सोमेश्वर नगर येथे आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी साखर कारखान्यांच्या संदर्भातील ही माहिती दिली. ही माहिती देताना त्यांनी भाजपला अप्रत्यक्षरीत्या लक्ष्य केले.राज्यातील अजूनही बारा साखर कारखाने लिलावात या प्रक्रियेत असून त्यांची टेंडर्स निघणार आहेत. ज्यांना धमक असेल, ज्यांना ते कारखाने चालवायची इच्छा असेल त्यांनी ते चालवायला घ्यावीत असे आवाहन त्यांनी केले.हे आवाहन करण्यामागे राज्यातील एकही साखर कारखाना नीट चालवता येत नाही, ते भाजप वाले मात्र दुसऱ्या साखर कारखान्यांच्या प्रमुखावर टीका करतात हा महाविकासआघाडीतील नेत्यांच्या आरोपाचा संदर्भ होता.
