संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या संदर्भात महाराष्ट्र विकास सेनेचे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन
इंदापूर ते अकलूज रस्त्यावर असलेल्या गावात दिलेल्या मोबदल्याची चौकशी करण्याची मागणी
प्रतिनिधी : पुणे : इंदापूर तालुक्यातील संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या रस्त्याच्या कामात जमिनी,बांधकाम संपादित झालेल्या सर्वच प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने करण्यात आली असून २४/१०/२३ रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग यावरती इंदापूर ते अकलूज या रस्त्यावर असलेल्या सुरवड शेटफळ फाट्यावरती असलेल्या आशीर्वाद मंगल कार्यालयाचे बांधकाम संपादित करताना त्या बांधकामांमध्ये असलेल्या खोल्या तसेच ज्या गोष्टी नमूद करून त्यांना मोबदला दिला आहे,त्याची बांधकाम परवानगी घेतलेली आहे का ? त्याची ग्रामपंचायत अथवा पंचायत समितीकडे नोंद केलेली आहे का ? त्या बांधकामाची एकूण असलेली नोंद किती ? आणि त्याला दिलेला मोबदला किती ? तसेच त्याचे बांधकाम रस्त्याच्या कामात संपादित करताना नियमाला धरून आहे का ? किंवा ते नियमानुसार संपादित करता येत होते का ? याची चौकशी करण्यात यावी.तसेच रस्त्यावर असलेल्या सर्वच गावातील जमीन,बांधकामे संपादित करताना भ्रष्टाचार झाल्याची शक्यता असून संपूर्ण मोबदला वाटप प्रकरणाची चौकशी करून जमीन मोबदला प्रकरणातील सर्व कार्यालयातील जबाबदार असलेल्या सक्षम अधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी विभागीय आयुक्त पुणे यांच्या कार्यालयासमोर पक्षप्रमुख किरण साठे यांच्या उपस्थितीत २४/१०/२३ रोजी तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे
