महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, मनपा निवडणुका कधी होणार? सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वपूर्ण निर्देश
नवी दिल्ली, 17 मे : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि महानगरपालिकेच्या निवडणुका (Municipal Corporation) पावसाळा झाल्यावर घ्याव्यात या संदर्भातील विनंती अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात केला होता. या अर्जावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
ज्या ठिकाणी फार पाऊस पडत नाही त्या ठिकाणी निवडणुका घ्यायला हरकत काय आहे? असा प्रश्न कोर्टाने विचारला आहे. जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणुकांचा कार्यक्रम तयार करावा असंही कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोग निवडणुकांबाबत कशाप्रकारे निवडणुका घेतं हे पहावं लागेल.
राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे या निवडणुका कदाचित तात्काळदेखील जाहीर होऊ शकतात. याआधी प्रभाग रचना, मतदार यादी, पाऊस यामुळे निवडणुका सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या जाऊ शकत होत्या. आगामी पुढच्या महिन्यात पावसाळा आहे. त्यामुळे पावसाळ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं कितपत शक्य आहे, असा प्रश्न आयोगाकडून या निमित्ताने उपस्थित करण्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आणि त्याकाळात मुसळधार पाऊस असला तर निवडणूक घेणं कठीण होईल, अनेक भागांत पूरस्थिती निर्माण होते, ईव्हीएमची वाहतूक करण्यासही अडथळा येऊ शकतो असं निवडणूक आयोगाने आपल्या अर्जात म्हटलं.
