नियोजित अकलूज नगरपरिषदेमध्ये यशवंतनगर व संग्रामनगरचा समावेश करूनच अंतिम मंजुरी द्यावी -युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्निल वाघमारे
अकलूज/प्रतिनिधी :-
अकलूज नगरपरिषदेमध्ये अकलूज व माळेवाडी ग्रामपंचायती सोबतच संग्रामनगर व यशवंतनगर याही ग्रामपंचायतींना सामाविष्ट करूनच अकलूज ‘ब वर्ग नगरपरिषद’ म्हणून मंजुरी मिळावी,यासाठी शिवसेना जेष्ठ नेते खासदार मा.गजानन किर्तीकर यांच्या मार्गदर्शनखाली मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,युवासेना प्रमुख तथा पर्यावरणमंत्री, सोलापूर जिल्हा पालकमंत्री तसेच नगरविकासमंत्री यांना युवासेना जिल्हा युवाअधिकारी स्वप्निल(भैया)वाघमारे व पंचायत समिती सदस्य सौ.प्राजक्ता वाघमारे यांचे संयुक्त निवेदन सादर केले.
अकलूज-माळेवाडी नगरपंचायतची प्राथमिक अधिसूचना सप्टेंबर 2019 रोजी प्रसिद्ध झाली व त्यासाठी हरकती,सूचना घेण्यासाठी द्वितीय अधिसूचना प्रसिद्ध होणे प्रतीक्षेत आहे.या अधिसूचनांमध्ये अकलूज व माळेवाडी सोबतच संग्रामनगर व यशवंनगर या ग्रामपंचायतीचा देखील समावेश करणे गरजेचे असल्याचे सांगत या दोन्ही विकसित ग्रामपंचायती एकत्र येऊन अकलूज,माळेवाडी, यशवंतनगर व संग्रामनगर अशी एकच अकलुज नगरपरिषद होणे गरजेचे आहे.कारण या चारही ग्रामपंचायतींमध्ये कोणतीही भौगोलिक अंतर व भौगोलिक सीमा नाहीत.या ग्रामपंचायती केवळ टेंभुर्णी-इंदापूर रस्त्याने विभागल्या गेल्या आहेत.
तसेच सदर ग्रामपंचायतीसाठीची महत्त्वपूर्ण पाणीपुरवठा योजना ही एकच आहे.अकलूज शहराच्या मुळ अकलूज ग्रामपंचायतीच्या वाढीसाठी मर्यादा येत असल्याने अकलुज ग्रामपंचायतीत राहणाऱ्या नागरिकांना विविध सेवा देणाऱ्या किराणा दुकाने, कापड दुकाने,छोटे-मोठे व्यवसायिक,प्राथमिक-माध्यमिक शिक्षक व नागरिकांना संग्रामनगर व यशवंतनगर येथे निवासी राहावे लागत आहे.तसेच ज्यांची उपजिविका ही पूर्णपणे अकलूज ग्रामपंचायती हद्दीतच अवलंबून आहे.
संग्रामनगर व यशवंनगर या ग्रामपंचायती अकलूज प्रादेशिक विकास आराखड्याचाच भाग असल्याने सुनियोजित,विकसित झाल्या आहेत.त्याचबरोबर अकलुज ग्रामपंचायत हद्दीतील शेकडो विद्यार्थी यशवंतनगर व संग्रामनगर या ग्रामपंचायत हद्दीतील शाळा,महाविद्यालयात शिकत आहेत.अकलुज ग्रामपंचायत खूप जुनी असल्याने भविष्यातील विकासासाठी तेथे आता जागा शिल्लक नसल्याने अकलूज परिसरात सेवा पुरवणारे उदा. दवाखाने,शोरूम,ठोक व्यापारी हे सार्वजनिक संग्रामनगर व यशवंतनगर या ग्रामपंचायत हद्दीत आपला व्यवसाय करीत आहेत.
नमूद चारही ग्रामपंचायती एकत्र येऊन अकलूज ही एकच नगरपरिषद झाल्यास त्या नगर परिषदेच्या विकासासाठी फार मोठी चालना मिळणार आहे तसेच अकलूज आणि परिसराला सहकाराची फार मोठी पार्श्वभूमी असल्याने विकासासाठी आवश्यक असणारा निधी आणि जागा या दोन्ही बाबतीमध्ये या चार ग्रामपंचायती मिळून प्रस्तावित होणारी अकलूज नगरपरिषद ही स्वयंपूर्ण होईल.
जर आता नमूद केल्याप्रमाणे केवळ अकलूज आणि माळेवाडी या दोन ग्रामपंचायतीची नगरपरिषद झाल्यास केवळ एकांगी विकास होऊ शकतो आणि सदर विकासाची फळे ही लगतच्या ग्रामपंचायतींना मिळणार नाहीत त्याचबरोबर सदर ग्रामपंचायतींवर होणाऱ्या नागरिकांचा भार हा अकलूज नगरपरिषदेवर पडू शकतो.मात्र संग्रामनगर व यशवंनगर ग्रामपंचायती मिळून अकलूज नगरपरिषद झाल्यास एक स्वयंपूर्ण नगरपरिषद निर्माण केल्याचे श्रेय स्थानिक सत्ताधारी व सरकारला मिळणार आहे,याचे फार मोठे सकारात्मक परिणाम नजीकच्या भविष्यात सदर भागात दिसून येतील.
अकलूज शहर हे दोन्ही मुख्य पालखी महामार्गावर(संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज)आहेत. यासाठी प्रत्येक वर्षी ग्रामपंचायतीला दिल्या जाणारा अनुदानाचा भार हा सरकारवर बसणार नाही.प्रस्तावित केली जाणारी नगरपरिषद ही वार्षिक उत्पन्न सुमारे 20 कोटी रुपये व त्यापेक्षा अधिक होऊ शकते. शहराचा सुनियोजित, संतुलित व सर्वांगीण विकासासाठी चारही ग्रामपंचायती एकत्र करून अकलूज नगरपरिषद होणे आवश्यक आहे.
निवेदन देतेवेळी श्री वाघमारे यांनी अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करतेवेळेस अकलूज व माळेवाडी ग्रामपंचायती सोबतच संग्रामनगर व यशवंतनगर या दोन्ही ग्रामपंचायतींचा समावेश होऊन 75 हजार लोकसंख्या असणाऱ्या बृहद अकलूज नगरपरिषद (27.21 चौ. कि.मी.) स्थापन होण्यास अंतिम अधिसूचना मध्ये शासनाच्या विशेष अधिकाराचा वापर करून समावेश करण्यात यावा अशी विनंती केली आहे.पूर्ण चौकशी व अहवाल तात्काळ मागवून अंतीम अधिसूचना करतेवेळी अकलूज नगरपरिषदमध्ये संग्रामनगर व यशवंनगर समाविष्ट करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे स्वप्निल वाघमारे यांनी सांगितले आहे.
