अखेर प्रदीप झेंडे यांचे धर्मपुरी ग्रामपंचायतच्या विरोधात आमरण उपोषणास यश
धर्मपूरी ग्रामपंचायतीने एलईडी बल व इतर साहित्य खरेदी करण्यामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याने गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप झेंडे यांनी केलेल्या तक्रारीचा अहवाल मिळत नसल्याने माळशिरस पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू केलेले होते. त्या उपोषणाची दखल घेत माळशिरस पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांनी लवकरच अहवाल देऊ असे पत्र दिलेले असल्याने अखेर प्रदीप झेंडे यांच्या आमरण उपोषणास यश आल्याने धर्मपुरी ग्रामस्थांमध्ये चर्चा विषय बनलेला आहे.
प्रदीप झेंडे व त्यांचे सहकारी उपोषणास बसल्यानंतर माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती किशोरराजे सूळ पाटील यांनी गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून संबंधित उपोषणकर्ते यांना तात्काळ अहवाल देण्याविषयी चर्चा करण्यात आली. त्याप्रमाणे पंचायत समितीकडून झेंडे यांना तशा प्रकारे पत्र देण्यात आले. त्यामध्ये काही चौकशा झालेल्या आहेत. काही होणे बाकी आहेत. लवकरच अहवाल दिला जाईल असे पत्र मिळाल्याने प्रदीप झेंडे व व त्यांचे सहकारी यांचे उपोषण मागे घेण्यात आलेले आहे. आज शुक्रवारी धर्मपुरी ग्रामपंचायत हद्दीत पंचायत समितीचे कर्मचारी चौकशीसाठी आल्याने धर्मपुरी पंचक्रोशीमध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे. लवकरच अहवाल मिळेल असा आशावाद उपोषण कर्त्यांचा झालेला आहे.