
विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या रुग्णालयावरती कारवाई करा—किरण साठे
प्रतिनिधी—लवंग—माळशिरस तालुक्यातील ज्या रुग्णालयाने विभागीय आयुक्त पुणे,व सोलापूर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून रुग्णालये बंद ठेवली आहेत,त्या रुग्णालयाचे चालक यांच्यावर त्वरित कारवाई करून त्यांची नोंदणी कायमची रद्द करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांना दिले आहे. देशासह महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन केल्याने सर्वसामान्य माणूस घरामध्येच बसून असताना या सर्वसामान्य माणसाला कोरोना ची लक्षणे सोडून इतर आजारासाठी दवाखान्यात जाणे आवश्यक आहे,मात्र माळशिरस तालुक्यातील सर्व खेड्यात गावातील,शहरातील खाजगी दवाखाने बंद करण्यात आले आहेत.हे खाजगी दवाखाने बंद करण्यात आल्याने सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आहेत, आणि या दवाखाने बंद करण्याच्या प्रकारामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.असेही निवेदनात म्हटले आहे. दवाखाने हे अत्यावश्यक सेवेमध्ये येत असल्याने ती सर्वसामान्य जनतेची महत्वाची गरज असून संबंधित खाजगी दवाखाने व रुग्णालय त्वरित चालू करण्याचे आदेश सोलापूर जिल्हा अधिकारी यांनी दिलेले असताना खाजगी दवाखाने व रुग्णालय बंद अवस्थेत दिसून येत आहेत, दवाखाने बंद ठेवून वैद्यकीय सेवा देण्यास नकार देणाऱ्या दवाखान्याची नोंदणी रद्द करण्याचा इशारा दिला असताना हे खाजगी दवाखाने जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या व विभागीय आयुक्त पुणे यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असल्याचे दिसून आले आहे.तरी संबंधित ज्या डॉक्टरांनी आपली रुग्णालये बंद ठेवली आहेत,त्यांच्यावर कारवाई करून त्या रुग्णालयाची नोंदणी कायमची रद्द करण्यात यावी असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी नमूद केले आहे.