माळशिरस ते पिलीव एसटी त्वरित चालू करा
अन्यथा तीव्र आंदोलन करणार – किरण साठे
प्रतिनिधी : माळशिरस : रा.प.अकलूज चे आगार व्यवस्थापक श्री प्रमोद शिंदे यांना बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी निवेदन देवून माळशिरस ते,चांदापुरी,तरंगफळ, मोठेवाडी,पिलीव एसटी बस सेवा चालू करण्याची मागणी केली आहे.यावेळी आनंद मिसाळ,इरफान बागवान,नारायण डांगे,शिवाजी गेजगे,आदित्य काकडे,साहिल अडगळे,सचिन साळुंखे इत्यादी उपस्थित होते.
माळशिरस ते पिलीव एसटी बससेवा सद्या बंद असून या एसटीच्या माध्यमातून माळशिरस वरून पिलीव येथे जात असताना संबंधित मार्गावर मोठेवाडी,तरंगफळ,चांदापुरी या गावांचा समावेश होत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
संबंधित गावातून एसटीच्या माध्यमातून विद्यार्थी आणि इतर प्रवाशांची सोय करण्यासाठी एसटी सेवा सुरू होती,माळशिरस ते पिलीव एसटी ही माळशिरस वरून संध्याकाळी ५ वाजता सुटून पिलीव मध्ये मुक्कामी होती त्यानंतर ती सकाळी ९ वाजता पिलीव वरून माळशिरस ला रवाना होत होती.त्यामुळे विद्यार्थी,तसेच माळशिरस येथे बाजाराला येणाऱ्या तसेच माळशिरस येथील कोर्ट,सरकारी कार्यालयात काम असणाऱ्या जनतेला दिलासा मिळत होता. सद्या पावसाळा असल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने तात्काळ माळशिरस ते पिलीव एसटी सेवा पत्रात नमूद केलेल्या वेळेनुसार चालू करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी निवेदनात दिला आहे.
